मासिक
परिचय
अंतर्नाद मासिक कशासाठी...

मराठी मासिकांच्या, आणि एकूणच मराठी साहित्याच्या, पडत्या काळात पुण्याहून अंतर्नाद हे मासिक संपादक व प्रकाशक भानू काळे यांनी १९९५ साली सुरू केले. त्याचा शेवटचा अंक २०२० साली दिवाळी अंकाच्या रूपाने प्रकाशित झाला. दरम्यानच्या सव्वीस वर्षांत मराठी साहित्यविश्वात अंतर्नाद मासिकाला एक आगळे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. मासिक सुरू करण्यामागची आपली भूमिका काळे यांनी मासिकाच्या अंकांतून अगदी प्रथमपासून सुस्पष्ट मांडली होती. ती साधारण पुढीलप्रमाणे होती:
“आजकाल कुठेही नजर फिरवा, आर्थिक समृद्धीबरोबरच सांस्कृतिक कंगालपणाच्या खुणाही पटकन नजरेत भरतात. सातासमुद्रापार कुठेही क्षणार्धात संपर्क साधायची सोय असलेला हातातला अत्याधुनिक मोबाइल आणि फ्लॅटच्या बंद दाराआड एकेकट्याने वाढणारी आपली संवादविन्मुख पुढची पिढी. ‘ग्लोबल व्हिलेज’ची अविरत चर्चा आणि एकमेकांच्या बिर्हाडात चुकूनही कधी पाय न ठेवणार्यांच्या ‘कोऑपरेटिव्ह’ सोसायट्या. नवनव्या उत्पादनांनी ओसंडणारी बाजारपेठ व टीव्हीवरचा रंगीबेरंगी जल्लोष आणि भावनांचे बधिरीकरण व जीवनाचे थिल्लरीकरण.
“आर्थिक समृद्धीइतकीच सांस्कृतिक समृद्धीचीही समाजाला गरज असते. ही सांस्कृतिक समृद्धी साहित्याच्या माध्यमातून वाढवण्याचा अंतर्नाद हा एक छोटा प्रयत्न आहे.
“दलाल स्ट्रीटवरचे चढउतार आणि शॉपिंग मॉलवरची दिलखेचक प्रलोभने ह्यांच्यापलीकडच्या एका आगळ्या, अधिक शाश्वत विश्वात श्रेष्ठ साहित्य आपल्याला घेऊन जाऊ शकते. टीव्हीवर काल काय बघितले, ते कदाचित आज आठवणार नाही, पण वीस-तीस वर्षांपूर्वी वाचलेले मात्र आजही आठवते. मनावर कोरले जाण्याची, संस्कार करण्याची लिखित शब्दांची क्षमता अजूनही उल्लेखनीय आहे. आज समाजजीवनाचा विविधांगांनी अफाट विस्तार होत आहे आणि साहजिकच साहित्याला समाजव्यवहारात पूर्वीइतके सर्वव्यापी महत्त्वाचे स्थान राहिलेले नाही, हे उघड आहे. परंतु चांगल्या साहित्याची अनेक सामर्थ्यस्थळे आजही लक्षणीय आहेत.
“चांगले साहित्य वाचकाला अंतर्मुख करते, त्याचबरोबर त्याची जिज्ञासा व संवादाची भूकही जागवते. जीवनाचे अल्पपरिचित पैलू नजरेसमोर आणून जाणिवेच्या कक्षा रुंदावते, त्याचप्रमाणे त्या सखोल करते; त्याला अस्वस्थ करते, उल्हसितही करते. अशा परस्परविरोधी परिणामांतून ते वाचकाच्या भावविश्वाला व्यामिश्रता आणि अनुभवविश्वाला अर्थपूर्णता देत असते. साहित्य नक्कीच स्वत:च्या बळावर समाजात परिवर्तन घडवू शकणार नाही, पण ते तशा परिवर्तनाच्या अपेक्षा मात्र नक्की निर्माण करू शकते; विकाससन्मुखता जोपासू शकते; एका अधिक चांगल्या समाजाचे स्वप्नतरी जिवंत ठेवू शकते. आपापल्या जगण्यातून प्रत्येक जण शिकतच असतो; साहित्य इतरही अनेकांच्या जगण्याचे सार आपल्यापर्यंत पोहोचवते. मनावर व समाजावर या सगळ्यातून कळत-नकळत संस्कार होत असतात, त्यातूनच सांस्कृतिक समृद्धीही साधली जात असते.

“ही सांस्कृतिक समृद्धी वाढवणे हे अंतर्नादचे ध्येय आहे. या मूलभूत व्यापक ध्येयाप्रत वाटचाल करण्याच्या दृष्टीने तीन सुस्पष्ट उद्देश ‘अंतर्नाद’ने पहिल्या अंकापासूनच समोर ठेवले आहेत :
१. मराठी भाषेच्या व साहित्याच्या संवर्धनाला हातभार लावणे.
२. सकस साहित्याच्या वाचनाची आवड जोपासणे.
३. अन्य माध्यमांतून आज सहसा स्थान न मिळणार्या पण मौलिक अशा वैचारिक व ललित दीर्घ लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
“हे तिन्ही उद्देश साधतील अशा प्रकारच्या साहित्यासाठी मासिक हे माध्यम आजही खूप सोयीचे आहे. मासिकातील साहित्य बातम्यांच्या आणि जाहिरातींच्या भाऊगर्दीत हरवून जात नाही. दैनिक वा साप्ताहिकाप्रमाणे घडलेल्या सर्वच घटनांवर घाईघाईने भाष्य करायची मासिकाला गरज नसते. मासिकातील लेखन तात्कालिक महत्त्वापेक्षा किंवा बातमीमूल्यापेक्षा अधिक व्यापक संदर्भावर बेतलेले असू शकते. ते चटपटीत शैलीपेक्षा अनुभवाच्या खोलीवर व व्यासंगावर भर देणारे असू शकते. ह्या लेखनासाठी तसेच त्यावर संस्कार करून आवश्यक अशा पुनर्लेखनासाठी पुरेसा वेळ देता येतो. कल्पनेच्या वा विचाराच्या समग्र अभिव्यक्तीसाठी आवश्यक एवढी जागाही मासिकाला देता येते. लेखनादरम्यान चर्चा-चिंतनाला वाव असतो. या सगळ्यामुळे ते साहित्य जास्त परिपक्व बनू शकते. वाचकाच्या वेळेवरही मासिक आक्रमण करत नाही. लेखनाचा योग्य तो आस्वाद घ्यायला, त्यावर विचार करायला आवश्यक तो निवांतपणा मासिकच वाचकाला देऊ शकते.
“इंग्रजीचा वा हिंदीचा दुस्वास न करताही मराठी भाषा व साहित्य समृद्ध करता येते, अशी अंतर्नादची धारणा आहे. कुठल्याही प्रकारची सामाजिक, राजकीय, वैचारिक वा साहित्यिक अस्पृश्यता अंतर्नाद पाळत नाही. अन्य कुठल्या नव्या-जुन्या मासिकाशी अंतर्नाद स्वत:ची बरोबरी करू इच्छित नाही, स्वत:विषयी अवास्तव दावेही करू इच्छित नाही.
“ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अंतर्नाद आज आपल्यापुढे येत आहे. आर्थिक समृद्धीप्रमाणेच सांस्कृतिक समृद्धीचचेही महत्त्व पटणाऱ्या व त्या संस्कृतीचे अनेक विशेष मातृभाषेतच सकसपणे व्यक्त होऊ शकतात हे ओळखणाऱ्या आधुनिक वाचकांसाठी एक दर्जेदार पर्याय म्हणून. विचारमंथनासाठी आवश्यक असे एक व्यासपीठ म्हणून. भोवतालच्या वास्तवाची स्पंदने टिपणारं साहित्य अंतर्नादमध्ये असेल. गांभीर्याने लिहिलेले आणि तरीही वाचनीय. आशय आणि अभिव्यतीतले वेगळेपण जपणाररे. आजच्या धकाधकीच्या जगात जास्त चांगल्याप्रकारे जगायला मदत करणारे. मानवी मूल्यांवरील श्रद्धा वाढवणारे. वादापेक्षा संवादावर, टीकेपेक्षा विधायक पर्यायांवर भर देणारे. लिखित शब्दांच्या अनंत क्षमता समर्थपणे व्यक्त करणारे. मुख्य म्हणजे सांस्कृतिक समृद्धी वाढवणारे.

“अंतर्नादमध्ये सुधारणांना भरपूर वाव आहे, याची आम्हांला जाणीव आहे. प्रत्येक मासिक हे शेवटी आपापल्या काळानुसार, परिस्थितीच्या मर्यादांनुसार, वाचकवर्गानुसार, स्वत: संपादकाच्या विशिष्ट अशा पिंडानुसार आणि सर्वांत निर्णायक म्हणजे मासिकात लिहिणारे लेखक शेवटी किती कसदार लिहितात त्यानुसार आकार घेत असते. मराठी साहित्यविश्वापुढच्या आजच्या अनेक गंभीर अडचणी तशा बहुपरिचित आहेत. पण त्या अडचणींवर यथाशक्ति मात करत इतकी वर्षे न चुकता दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अंतर्नादचा अंक प्रकाशित होत आहे.”
आपल्या संपूर्ण वाटचालीत अंतर्नादने आपली ही भूमिका यथाशक्ती कायम राखली. अंतर्नादच्या बहुतेक सर्व लेखकांनी, वर्गणीदारांनी, जाहिरातदारांनी, विक्रेत्यांनी, वेळोवेळी निगडीत असलेल्या सहकार्यांनी व अन्य व्यावसायिक संबंधितांनीदेखील या उपक्रमात मनःपूर्वक सहकार्य दिले. आज २०२३ साली या उपक्रमाकडे वळून बघताना भानू काळे यांना काय वाटते?
ते म्हणतात, मासिक चालवून कधी क्रांती होत नसते, भरीव असे सामाजिक बदलही होत नसतात, मासिक कधीच मोठी अशी समाजसेवाही करत नाही, उगाचच मोठे मोठे दावे करण्यात अर्थ नाही. मग अंतर्नादने नेमके काय केले? ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी सव्वीस वर्षे काही चांगले साहित्य उपलब्ध करून दिले आणि ज्यांना लेखनाची आवड आहे त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिले. चांगले साहित्य चांगल्या वाचकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचवणे हे कुठल्याही मासिकाचे जीवितकार्य असते आणि आपण ते यथाशक्ती इतकी वर्षे केले, प्रयत्नांत काही कसर ठेवली नाही हाच तेवढा त्यातल्या त्यात समाधानाचा भाग. विनोबा म्हणतात त्याप्रमाणे शेवटी प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक आहे.
‘निवडक अंतर्नाद’ हे दिवाळी २०२१मध्ये प्रकाशित केलेले संकलन या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यावरून अंतर्नादच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकेल. अंतर्नादविषयी काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे. त्यांवरूनही अंतर्नादच्या एकूण योगदानाची कल्पना येऊ शकेल –

भानू काळे
हे एक चिंतनशील लेखक व संपादक आहेत. यांचा जन्म मुंबई येथे ११ एप्रिल १९५३ रोजी झाला. त्यांनी समाजशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली असून पाच वर्षे एका स्वयंसेवी संस्थेबरोबर त्यांनी पूर्णवेळ काम केले. त्याच दरम्यान हिंमत या इंग्रजी साप्ताहिकातून त्यांनी आपली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर सतरा वर्षे त्यांनी मुंबईत उत्तमप्रकारे स्वतःचा मुद्रणव्यवसाय केला. परंतु त्यात अडकून न पडता, मराठी साहित्याच्या त्या पडत्या काळात, एक दर्जेदार मराठी मासिक सुरू करायचे त्यांचे स्वप्न होते. त्याचसाठी आपला मुद्रणव्यवसाय बंद करून १९९४ साली ते पुण्यात स्थलांतरित झाले आणि त्यांनी अंतर्नाद मासिक सुरू केले. हे प्रवाहाविरुद्धच पोहोणे होते; पण तरीही अल्पावधीतच चोखंदळ वाचकांच्या वर्तुळात अंतर्नादला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. अलीकडेच २६ वर्षांनंतर त्यांनी अंतर्नाद बंद करायचा निर्णय घेतला.
तिसरी चांदणी, कॉम्रेड ह्या कादंबऱ्या, बदलता भारत हे जागतिकीकरणाच्या पश्चात बदलणाऱ्या भारताचा वेध घेणारे आगळे प्रवासवर्णन, अंतरीचे धावे हा ललितलेखसंग्रह, रंग याचा वेगळा... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन हे संपादित संकलन आणि अजूनी चालतोची वाट... रावसाहेब शिंदे जीवन आणि कार्य, अंगारवाटा... शोध शरद जोशींचा, वसंतवैभव... वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा व समतानंद अनंत हरी गद्रे ही चार प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण चरित्रे अशी बहुविध साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्या पुस्तकांची संपूर्ण यादी याच संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या सर्वच पुस्तकांना वाचक आणि समीक्षक यांची मान्यता आणि विविध मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या चेंज फॉर बेटर या विधायकतेवर भर देणाऱ्या दर्जेदार इंग्रजी त्रैमासिकाची स्थापना आणि संपादनही त्यांनी केले. २००८ साली इचलकरंजी येथे भरलेल्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. तीसहून अधिक देशांत प्रवास केलेले आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी निगडीत असलेले भानू काळे पुण्यात राहतात.
भानू काळे यांची रसिकमान्य पुस्तके















अभिप्राय
'अंतर्नाद' म्हणजे...... समृद्ध साहित्यसृष्टी वाचकांना सुसंस्कृत करू पहाणारी सकारात्मक जीवनदृष्टी ... सांस्कृतिक समृद्धीची नाममुद्रा … मराठी संस्कृतीकारणाचा मानबिंदू… सर्वस्पर्शी रसिकतेचा अनाहत नाद ... आधुनिक,सर्जनशील आणि सौंदर्योपासक समाजनिर्मितीचा निरंतर ध्यास... प्रतिभावान लेखकांच्या साधनेची अभिव्यक्ती... सकस मराठी साहित्याचा दुर्मिळ खजिना ... जणू सूपभर लाह्यात दडलेला एकच बत्तासा..

महाराष्ट्राची वाचनसंस्कृती, अभिरुचीसंपन्नता आणि ज्ञान-विज्ञानासह बौद्धिक मनोरंजन यांत भर घालणारे अंतर्नाद हे मासिक त्याच्या क्षेत्रातले सर्वाधिक लोकप्रिय व सर्वश्रेष्ठ म्हणावे असे होते. वाचकांनी वाट पाहावी, समाजाने मार्गदर्शन शोधावे आणि ज्ञानाने रंजकतेची कास धरावी असा अंतर्नादचा पेहराव आणि अंतर्भाव होता. मासिक म्हणून आज ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरी अंतर्नाद आणि त्याचे संपादक भानू काळे यांनी मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिलेले योगदान कोणाच्याही विस्मरणात जाणार नाही. चांगल्या नियतकालिकांना वाईट दिवस येणे ही आपल्या सांस्कृतिक घसरणीची बाब आहे. लोकजीवन अधिक सुसंस्कृत करण्याच्या गरजेच्या काळातले हे विपरित आहे.

माझ्या साहित्यिक प्रवासात अंतर्नादचे स्थान अद्वितीय आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातही या मासिकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विदेशात असतानासुद्धा मला भारताच्या विविध आयामांचे दर्शन घडवण्याचे काम अंतर्नादने केले आहे. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे तीनही धागे जुळवून मराठी माणसाची अभिरुची संपन्न करण्याची भूमिका निभावत असतानाच साहित्यिक अभिरुचीचे लोकशाहीकरण करण्यातही अंतर्नाद आघाडीवर राहिले आहे.

गेली अनेक वर्षे अंतर्नादने मराठी वाचकाच्या मनाची मशागत केली. त्याची संवेदनशीलता तरल केली. वाचकाला ३६० अंशांच्या त्रियामी कक्षेतून फिरवत त्याच्या साहित्यिक जाणिवेची क्षितिजे विस्तृत केली. अंतर्नादने कुठलाच विषय वर्ज्य मानला नाही. भाषेपेक्षा साहित्य आणि साहित्यापेक्षा जीवन श्रेष्ठ असते याचे भान अंतर्नादने ठेवले.

आमच्या जाणिवा समृद्ध करून, आमच्यातील उणिवा हळुवारपणे अधोरेखित करण्याचे काम अंतर्नादने पंचवीस वर्षे केले आहे. अनेक लेखकांना याचा फायदा होऊन त्यांचे लिखाण उजळून निघायचे. यास्मिन शेख यांच्यासारखा व्याकरण-सल्लागार असणारे अंतर्नाद हे बहुधा एकमेव मराठी मासिक असावे. भानूदा व वर्षाताई यांची सांस्कृतिक समृद्धीची कल्पना नुसते वैभवशाली गतकाळाचे स्मरणरंजन करीत राहणारी नव्हती; तर ती वर्तमानातील चांगुलपणा टिपत आशादायी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. चंगळवाद व तुच्छतावाद यावर हा उतारा आहे. हे करण्याचे दोन मार्ग भानुदांसमोर होते. लेखन व संपादन. त्यांनी हे दोन्ही मार्ग चोखाळले. पण हे करताना त्यांच्यातील संपादकाने लेखकावर थोडीफार मात केली.

सांस्कृतिक अभिरुचीच्या विकासप्रक्रियेत नियतकालिकांचा मोठा वाटा असतो. या संदर्भातले अंतर्नादचे श्रेय नोंदवायला हवे. अंतर्नादचा कालखंड हा दोन शतकांचा संधिकाल होता. त्या कालखंडातील आव्हाने ओळखून संपादकांनी परंपरेतील सत्त्वांश वेचलेच, पण त्याचबरोबर बदलत्या भविष्याचा वेध घेणारे लेखनही सामावून घेतले. विविध सदरांची योजना, मुखपृष्ठ, मांडणी यांतून प्रगट झालेली संपादकीय दृष्टी कलात्मकतेची जपणूक करतानाच जीवनाभिमुखही राहिली. भाषा , साहित्य आणि इतर कला या घटकांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंती कशी जपायची, याची जाणीव भानू काळे यांना होती. त्यामुळे अंतर्नादला स्वतःचा अमीट ठसा उमटवता आला, हे महत्त्वाचे आहे.

मराठी माणसाचे काही खरे नाही. मानदंड ठरावीत अशी ज्योत्स्ना, अभिरुची, छंद, सत्यकथा, किर्लोस्कर, सोबत, माणूस अशी नियतकालिके तो उभी करतो, आणि मग बंदही करतो! महाराष्ट्रात मासिक चालवणे म्हणजे लाखाचे बारा हजार करणे. हे असे का होते? रसिकता कमी पडते की व्यवहार जमत नाही? पण मराठी माणसांचे खरेच काही खरे नाही. कारण हे असे होत असताना, हे असेच होणार हे समजत असताना एक मराठी माणूस मुंबईमधील आपला सुस्थितीत असलेला व्यवसाय बंद करतो, पुण्याला येतो, ‘प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री’ असे म्हणत सांस्कृतिक समृद्धीसाठी म्हणून अंतर्नाद सुरू करतो. त्यानंतरच्या वाटचालीत अंतर्नादने इतिहास घडविला. साहित्यातील नवे-जुने हे वाद मानले नाहीत. राजकारणातील डावे-उजवे यांना सन्मानाने सारख्याच अंतरावर ठेवले. पुरोगामी-प्रतिगामी असेही काही मानले नाही. वाचकांना बदलत्या भारताचे दर्शन घडविले आणि नव्या जगाची सुरवात स्वत:पासून होते हे सहजपणे समजावून दिले. चटपटीत पण टाईमपास नव्हे, वैचारिक पण जांभई द्यावयास लावणारे नव्हे असे ललितचिंतनाचे एक प्रसन्न दालन साहित्यविश्वात अंतर्नादने प्रस्थापित केले.

सुसंस्कृत समाजासाठी निकोप अभिरुचीची गरज असते. अभिरुचिसंपन्न वाङ्मयव्यवहार हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. तशी अभिरुची विकसित करण्यासाठी काही लोकांना झोकून देऊन काम करावे लागते, त्याग करावा लागतो. असा त्याग भानू आणि वर्षा काळे यांनी केला. भानू काळे एक श्रेष्ठ प्रतीचे कादंबरीकार आहेत. परंतु त्यांनी स्वतःचे ललितलेखन बाजूला ठेवून मुक्त विचारांना वाहिलेले अंतर्नाद हे वाङ्मयीन नियतकालिक पंचवीस वर्षे चालवले आणि निकोप वाङ्मयीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
